सासवड – शिवरी (ता. पुरंदर) श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड मुक्कामानंतर शिवरी मार्गे गेल्यानंतर शिवरी येथे रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात कचर्याचे ढिगारे तसेच पडून होते. या कचर्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयाच्या परिसरात व शिवरी येथे असलेल्या पुलाखाली दुर्गंधी व अस्वच्छता पसरली होती. या संदर्भात वस्तुस्थिती दर्शवणारे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध करून संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधल्यानंतर ते तातडीने उचलण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टीआयपीएल या रस्त्याच्या कंत्राटदार कंपनीकडून कचरा उचलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे स्वच्छता कामगारांच्या मदतीने रस्त्यावर पडलेला कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या कामामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वृत्तपत्रांनी प्रश्न मांडल्यास प्रशासन हालचाल करतं, याचं हे उत्तम उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी दिली.