Satara | सरसकट आले खरेदीचा अखेर निर्णय

सातारा, (प्रतिनिधी)- शेतकरी व इतर घटकांकडून बाजार आवारात आणि शेताच्या बांधावर परंपरागत सरसकट पद्धतीने आल्याची खरेदी करावी, असे परिपत्रक राज्याच्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग पणन संचालनालयाने काढले आहे. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे.
राज्यात वर्षानुवर्षे प्रतवारी न करता सुरू असलेली खरेदी बंद करण्याचा घाट व्यापाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागले आहेत,
या प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून उचित कार्यवाही व्हावी अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना सादर केले होते. त्यावर श्री. सत्तार यांनी 30 जुलै 2024 रोजी सिल्लोड येथे आयोजित बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सहकार आणि पणन विभागाने हे परिपत्रक काढले आहे.
परिपत्रकात म्हटले आहे की शेतकरी व इतर घटकांकडून बाजार समिती आवारात येणाऱ्या आल्याची खरेदी करताना ती परंपरागत व सरसकट पद्धतीने खरेदी करावी, अशी सूचना बाजार समित्यांनी आपल्याकडील परवानाधारक व्यापारी व अडते यांना कराव्यात.
तसेच नवे जुने आले वेगळे आणण्याचा आग्रह धरू नये, आले खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर त्याची सौदा पट्टी करावी. त्यावर दर कसा देण्यात आला आहे याचा स्पष्ट उल्लेख अधिकृत बिलावर करावा, याबाबत काही तक्रारी बाजार समितीला प्राप्त झाल्यास तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी बाजार समितीने व्यवस्था करावी. जे व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर आले खरेदी करतात,
त्यांनीही नवे जुने आले असा वेगळा आग्रह धरू नये, बाजार समितीने आल्यास योग्य भाव मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न उपाययोजना कराव्यात, असे पत्रकात नमूद आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी राज्य शासनाला धन्यवाद दिले आहेत.





