Coastal Road : दहिसर ते भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा

मुंबई : केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. येत्या 3 वर्षात हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मिरा-भाईंदर हे अंतर कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
केंद्रीय मिठागार मंत्रालय व राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे दहिसर – भाईंदर 60 मीटर रस्त्यामधील 53.17 एकर जागा मिठागार मंत्रालयाने राज्य शासनाच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याची मान्यता दिली आहे. यामुळे दहिसर ते भाईंदर आणि वसई-विरारकडे जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोस्टल रोड हा उत्तन पर्यंत येणार आहे. तेथून दहिसर -भाईंदर हा 60 मीटर रुंदीचा रस्ता मिरा रोड येथील सुभाष चंद्र बोस मैदानापर्यत येवून तिथून वसई विरार या दोन शहराला वसई विरार जोडला जाणार आहे.
त्यासाठी येणारा ३ हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे. भविष्यात या मार्गामुळे मीरा-भाईंदर हे मुंबईशी अधिक जोडले जाईल, व लवकरच मुंबई शहराचे उपनगर म्हणून आपली ओळख निर्माण करेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.





