मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटांत पोहचता येणार; कोस्टल रोडवरील ब्रिज आजपासून प्रवाशांसाठी सुरू

Mumbai Costal Road | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या उत्तरेकडील भागाचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर आजपासून हा रस्ता प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात आला आहे. कोस्टल रोडच्या नव्या मार्गिकेमुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास केवळ 15 मिनिटांत करता येणार आहे. यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार आहे. आधी नरिमन पॉईंट ते वांद्रे असा प्रवास करण्यासाठी एक ते दिड तास लागत असे.
हा रस्ता मुंबईकरांसाठी सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे. या किनारपट्टी रस्त्याची एकूण लांबी १०.५८ किमी एवढी आहे. राज्य सरकारने या सागरी रस्त्याला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड असे नाव दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आता मुंबईकरांना मरीन ड्राईव्ह ते दहिसर हा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे कोस्टल रोड, वरळी-वांद्रे सी लिंक मार्गे सिग्नल मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आाता वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून सोमवार २७ जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. यामध्ये मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका, मरीन ड्राईव्ह कडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
– धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई किनारा रस्ता प्रकल्प व वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणारा पुल आहे. या पुलाची एकूण लांबी ८२७ मीटर असून वजन २४०० मेट्रीक टन आहे.
– हा प्रकल्प शामलदास गांधी मार्ग अर्थात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
– धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता दक्षिण या मार्गाचे लोकार्पण झाले. यामुळे मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार आहे.
– मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठी आणि मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका सुरू होणार आहे. याशिवाय बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी मार्गिका देखील सुरू होणार.
प्रकल्पाचे फायदे
– या मार्गिकेमुळे वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे.
– ध्वनी प्रदूषण व वायुप्रदूषणात घट होण्यास मदत होईल.
– मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह साकारण्यात येत आहेत.
– मुंबईकरांना नवीन विहारक्षेत्र लाभणार असून या प्रकल्पात सागरी संरक्षण भिंतीची उभारणी होईल, यामुळे किनाऱ्याची धूप होणार नाही आणि समुद्राच्या उंच लाटांपासून प्रकल्पाचे संरक्षण होईल.





