Dagdusheth Ganpati Trust : पुणेकरांना पाहता येणार स्वदेशी शस्त्रास्त्रे! दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे लष्करी शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन..वाचा सविस्तर
देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देत अभेद्य शस्त्रास्त्रे पुण्यामध्ये गेल्या १५० वर्षांपासून साकारली जात आहेत. ऍम्युनिशन्स इंडिया लिमिटेडतर्फे पुण्यात साकारलेली

Dagdusheth Ganpati Trust – देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देत अभेद्य शस्त्रास्त्रे पुण्यामध्ये गेल्या १५० वर्षांपासून साकारली जात आहेत. ऍम्युनिशन्स इंडिया लिमिटेडतर्फे पुण्यात साकारलेली आणि भारतासह विविध देशांत निर्यात केली जाणारी भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हे अनोखे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोर दि. २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.प्रदर्शनात भारतीय पायदळ, नौदल, हवाई दलासाठी लागणारी शस्त्रास्त्रे,
दारूगोळ्यांसह विविध प्रकारची युद्धसज्जतेसाठी आवश्यक असलेल्या साधनांची मॉडेल्स देखील ठेवण्यात येणार आहेत. सैन्य दलातील जवान या प्रदर्शनाच्या नियोजनात सहभागी असून, पुणेकरांनी प्रत्येक शस्त्राविषयी माहितीही तात्काळ घेता येणार आहे. ग्रेनेड, लढाऊ विमानातील बॉम्ब, रॉकेटचे विविध प्रकार, तोफांसाठी लागणारा दारूगोळा, विविध प्रकारचे ड्रोन, मल्टी बॅरेल लॉन्च सिस्टिम, बुलेटस्, हँड ग्रेनेड, अँटि सम्बरिन रॉकेट, एरियल बॉम्ब यांसह विविध प्रकारची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी मिळणार आहे.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, भारतीय संरक्षण व्यवस्था ही जगातील ४ थी सर्वात शक्तिशाली सैन्यशक्ती आहे. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. देशाच्या या संरक्षण व्यवस्थेत पुणे हे महत्त्वाचे केंद्र असून, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, सीएमई, डीआरडीओ सारख्या संस्था पुण्यामध्ये आहेत.
त्याचप्रमाणे संपूर्ण देशात शस्त्रास्त्रे पुरविण्यासाठी पुण्यातील ऍम्युनिशन्स इंडिया लिमिटेड कार्यरत असून, त्यांच्या सहकार्याने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असून, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.





