सातारा – कोरेगाव मतदारसंघात जनतेची साथ रिपाइंला दादासाहेब ओव्हाळ; कोडोलीत कार्यकर्त्यांशी संवाद

सातारा – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनता प्रस्थापितांना कंटाळली असून या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मतदार साथ देतील, असा विश्वास कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) उमेदवार दादासाहेब ओव्हाळ यांनी व्यक्त केला.
कोडोली चंदनगर (ता. सातारा) येथे प्रचारादरम्यान श्री. ओव्हाळ बोलत होते. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष मदन खंकाळ, कार्याध्यक्ष रामभाऊ मदाळे, अतुल कांबळे, सागर फाळके, आनंदा गादेवार, सुरेश पवार, सुनील ओव्हाळ आदी उपस्थित होते. दादासाहेब ओव्हाळ म्हणाले, कोरेगाव मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीला रिपाइंची ॲलर्जी आहे असे दिसत आहे. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये नाराज कार्यकर्त्यांनी सामील होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दलित मताची ताकद दाखवून द्यावी. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला त्यावेळी एकही निळा झेंडा दिसला नाही. त्यामुळे येणारा काळ त्यांना कधीही माफ करणार नाही. निळ्या झेंड्याचा अपमान म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे याची जाण ठेवावी. या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांबद्दल जनतेत नाराजी असून मतदार आपल्याला निश्चितच साथ देतील, असा विश्वास दादासाहेब ओव्हाळ यांनी व्यक्त केला.
मदन खंकाळ म्हणाले, आमच्या मताचा आम्ही आता वापर होऊ देणार नाही. दादासाहेब ओव्हाळ यांच्या पाठीशी गावोगावी ताकद उभी करुन त्यांना जास्तीत जास्तीत मते मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. रिपाइंने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली असून दादासाहेब ओव्हाळ यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांचे प्रश्न पोटतिडकीने सोडवले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील जनता निश्चितच त्यांना साथ देईल.





