NCP News: “दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय”; अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भावनिक पोस्ट
NCP News: कार्यकर्त्याला 'आपलं' म्हणणारा माणूस हरपला

NCP News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अजित पवार यांच्या अचानक जाण्याची सर्वांनी उणीव भासते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अल्पसंख्याक समाजातील प्रभावी नेते सलीम सारंग यांनीही फेसबुक पोस्ट शेअर करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!” असे म्हणत सलीम सारंग यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
सलीम सारंग यांची फेसबुक पोस्ट
“दादा, तुमच्या जाण्याने मला फरक पडलाय! आज तुम्हाला जाऊन पाच महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकत आहे, पण तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र दिवसेंदिवस अधिक जाणवते आहे. दादा, तुम्ही आमच्यासाठी फक्त पक्षाचे नेते नव्हतात, तर कार्यकर्त्यांचा विश्वास होता.
कोणतीही अडचण आली की, आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही विनंतीची गरज न्हवती. मात्र आता स्वतःची ओळख सांगावी लागते, भेटीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, अनेकदा विनंती करावी लागते… आणि एवढं करूनही उत्तर मिळत नाही,” असे सलीम सारंग यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
“तुमच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायचं की, “माझ्या पाठीशी माझा नेता आहे.” आज ती भावना हरवत चालली आहे.कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, प्रश्न आणि संवाद याकडे पूर्वीसारखं लक्ष दिलं जात नाही, ही खंत मनात कायम आहे. बैठका होत नाहीत, संवाद कमी झाला आहे, आणि कार्यकर्त्यांचा आवाज वरपर्यंत पोहोचतोय की नाही, हा प्रश्न पडू लागला आहे.
दादा, पाच महिने झाले… पण तुमच्या जाण्याने पडलेली ही उणीव आजही भरून निघालेली नाही. तुमच्यासारखा कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा, त्याला वेळ देणारा आणि त्याच्या पाठीशी निस्वार्थपणे उभा राहणारा नेता आज खूप मिस होतो. दादा, तुमच्या जाण्याने फक्त एक नेता गेला नाही… कार्यकर्त्याला ‘आपलं’ म्हणणारा माणूस हरपला आहे. दादा तुमच्या पवित्र स्मृतींना विनम्र आदरांजली”, असे म्हणत सलीम सारंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजितदादांच्या नेतृत्वाची उणीव भासत आहे. वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणे दुरापास्त झाल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सारंग यांच्या पोस्टमधून समोर आले आहे. सलीम सारंग यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींविषयी नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
हेही वाचा:






