Dada Bhuse – शिक्षणाचा प्रसार अधिक व्यापक होण्यासाठी सामूहिक प्रयत्न केल्यास साक्षर भारताचे स्वप्न निश्चित साकार होईल, असे प्रतिपादन शालेय दादा भुसे यांनी केले. केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय उल्लास मेळावा नाशिक येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी ना. भुसे बोलत होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवळ मुली या शाळेतून नवसाक्षर झालेल्या सौ. आशा कांबळे, स्वयंसेविका उर्मिला सादळे यांना ना. भुसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. उल्हास नवभारत साक्षरता योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम व असाक्षरांसाठी केलेले अध्ययन अध्यापन साहित्य, मतदान जागृती या विषयावर आधारित स्टॉलची यावेळी ना. भुसे यांनी पाहणी केली. यावेळी नवभारत साक्षरता सातारा जिल्हा विशेषांक शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर यांनी सादर केला. शिक्षण संचालक योजना- कृष्णकुमार पाटील, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक ,कोल्हापूर विभागीय उपसंचालक प्रभावती कोळेकर, उपसंचालक योजना विभाग वंदना वाव्हुळ यांनीही स्टॉलला भेट देऊन शिरवळ जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ. नूरजहाँ काझी यांनी नवसाक्षरासाठी बनवलेल्या अध्ययन अध्यापन साहित्याचे, केंद्रप्रमुख वारागडे व सहकारी शिक्षकांनी बनविलेल्या मतदार साक्षरता संदर्भातील साहित्याचे कौतुक केले.