D.Y.Chandrachud : निकाल देण्याची जबाबदारी केवळ न्यायाधीशांचीच; माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केले स्पष्ट
न्यायालयातील कंटाळवाणी आणि दैनंदिन कामे करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत नक्कीच होऊ शकते; मात्र खटल्याचा निकाल देण्याची आणि त्यामागील कारणे स्पष्ट करण्याची जबाबदारी ही केवळ न्यायाधीशांचीच राहिली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D.Y.Chandrachud) यांनी केले.

D.Y.Chandrachud : न्यायालयातील कंटाळवाणी आणि दैनंदिन कामे करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत नक्कीच होऊ शकते; मात्र खटल्याचा निकाल देण्याची आणि त्यामागील कारणे स्पष्ट करण्याची जबाबदारी ही केवळ न्यायाधीशांचीच राहिली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D.Y.Chandrachud) यांनी शनिवारी केले.
एआय फॉर ऑल : एआय गव्हर्नन्स अँड ट्रस्ट या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक निकालावर मानवी स्वाक्षरी आणि निर्णय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले (D.Y.Chandrachud) की, लिप्यंतरण, भाषांतर, खटल्यांची यादी करणे आणि त्रुटी तपासणे ही कामे रटाळ असून यात न्यायालयाचा सर्वाधिक वेळ जातो. एआयचा सर्वोत्तम वापर याच कंटाळवाण्या कामांसाठी होऊ शकतो.
जेव्हा तंत्रज्ञानाला यापेक्षा काहीतरी वेगळे आणि गुंतागुंतीचे करण्यास सांगितले जाते, तेव्हा खरी समस्या सुरू होते. एआयने तयार केलेल्या खोट्या न्यायालयीन संदर्भांच्या (फेक सायटेशन्स) वाढत्या प्रकारांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. आंध्र प्रदेशातील एका कनिष्ठ न्यायालयाने अस्तित्वात नसलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या चार निकालांचा आधार घेतला होता, तर एका न्यायाधिकरणाच्या आदेशात खऱ्या निकालांमध्ये बनावट परिच्छेद जोडले गेले होते.
मशीनने केलेल्या प्रत्येक भाषांतराची आणि संदर्भाची पडताळणी माणसानेच केली पाहिजे. कोणीही न तपासलेले भाषांतर ही केवळ निकालाबाबतची एक अफवा असते, असा टोला त्यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाच्या एआय समितीने या वर्षी ३ जून रोजी न्यायालयांमध्ये एआय वापरण्याबाबतचा मसुदा जाहीर केला आहे.
यामध्ये खटले व्यवस्थापन, भाषांतर आणि संशोधनासाठी एआयला परवानगी असली तरी जामीन मंजूर करताना आरोपीचा धोका तपासण्यासाठी किंवा साक्षीदाराची विश्वासार्हता ठरवण्यासाठी एआयच्या वापरावर बंदी घालण्यात (D.Y.Chandrachud) आली आहे.
न्यायालयात एआय वापरासाठी पाच निकष :
अंतिम निर्णय न्यायाधीशांचा : एआयने शपथ घेतलेली नाही, त्यामुळे निर्णय आणि त्याची कारणे केवळ न्यायाधीशांचीच असावीत.
स्वातंत्र्याचा हक्क : जामिनासारखा निर्णय कोणत्याही प्रोबॅबिलिटी स्कोअरवर नव्हे, तर घटनेच्या कलम २१ नुसार वैयक्तिक परिस्थिती पाहूनच घेतला जावा.
पारदर्शकता : खटल्यात एआयचा वापर केला असल्यास पक्षकारांना त्याची माहिती देणे आणि चुकांना आव्हान देण्याची सोय असणे आवश्यक आहे.
शेवटच्या घटकापर्यंत न्याय : निकाल ज्या दिवशी दिला जाईल, त्याच दिवशी तो पक्षकाराला मराठी किंवा आसामी भाषेत मिळावा आणि साध्या फोनवरूनही पुढची तारीख विचारता यावी, हाच एआयचा खरा उपयोग आहे.
डेटा सुरक्षा : देशाचा स्वतःचा डेटाबेस आणि भारतात तयार झालेले एआय मॉडेल असावे.






