Cyclone Midhili: बंगालच्या उपसागरात ‘मिधिली’ चक्रीवादळाचे थैमान ; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Cyclone Midhili: बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘मिधिली’ चे चक्रीवादळात रूपांतर झाले. हे चक्रीवादळ सुंदरबनवरून पुढे सरकत प्रतितास ८० कि.मी.वेगाने बांगलादेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यासोबतच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरावरील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे मिधिली चक्रीवादळात रूपांतर होऊन ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकत आहे. ते आज सकाळी प.बंगालमधील दिघापासून २०० कि.मी.वर तर बांगलादेशातील खेपुपारापासून २२० कि.मी.वर होते. ‘मिधिली’ चक्रीवादळ खेपुपाराजवळ आज रात्री किंवा उद्या सकाळी बांगलादेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास ६० ते ७० कि.मी. राहू शकतो. तसेच तो ८० कि.मी. प्रतितासपर्यंत पोचू शकतो.
मात्र, मिधिली चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यापासून १५० कि.मीवरून जाणार असल्याने राज्यात फारसा परिणाम जाणवणार नाही. मात्र, ओडिशातील केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामानतज्ज्ञ उमाशंकर दास यांनी सांगितले. ओडिशाप्रमाणेच प. बंगालच्या किनारी जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचा सामना करावा लागणाऱ्या देशांकडून क्रमाने त्यांचे नामकरण केले जाते. त्यानुसार, मालदीवने या चक्रीवादळाला ‘मिधिली’ असे नाव दिले आहे. दरम्यान, ‘मिधिली’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मिझोराम, त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर, आसाम आणि मेघालय या राज्यांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.




