बीजिंगजवळ पोहोचेपर्यंत चक्रिवादळ गायेमी झाले सौम्य; वादळाच्या परिणामामुळे मध्य चीनमध्ये मोठा पाऊस

बीजिंग – गायेमी चक्रिवादळ चीनच्या मध्य भागापर्यंत पोहोचले असून या वादळामुळे या भागात मोठा पाऊस सुरू झाला आहे. या भागापर्यंत पोहोचेपर्यंत चक्रिवादळाचे रुपांतर सर्वसामान्य वादळामध्ये झाले आहे.
मात्र तरिही या वादळामुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. पावसामुळे पूर आले तर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र कोठेही जीवितहानीचे अथवा मोठ्या वित्तहानीचे वृत्त नाही.
गायेमी चक्रिवादळ चीनच्या मुख्य भूमीपर्यंत पोचण्यापूर्वी तैवानच्या खाडीतून गेले होते. त्यामुळे तैवानमध्ये या वादळामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. फिलिपीन्समध्येही वादळामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या ३४ झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वादळामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे आणि संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आले आहेत. अनेक ठिकाणी लोकांना सुरक्षिततेसाठी घरांच्या छपरांवर आश्रय घ्यावा लागला आहे.
गुरुवारी संध्याकाळी फिजीयान प्रांताच्या किनारपट्टीला धडकण्यानंतर गायेमी वादळाची तीव्रता कमी झाली होती. मात्र अजूनही या भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे वादळ आता चीनच्या इशान्येकडील जियांक्सी, हुबेई आणि हेनान प्रांतांच्या दिशेने सरकले आहे. वादळामुळे फुजियान प्रांतातील ८५ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
यामुळे ११.५ दशलक्ष युआन (१.६ दशलक्ष डॉलर) चे आर्थिक नुकसान झाले आहे. तर २ लाख ९० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे.
चीनमध्ये अन्यत्र या आठवड्यात मोठा पाऊस झाला आहे. या पावसामुळे गानेसू प्रांतात एक ठार झाला. तर देशाच्या वायव्येला अतिवृष्टीमुळे तिघेजण बेपत्ता झाले आहेत.





