वडिलांना सायकलवर घेऊन १३०० किमी प्रवास करणाऱ्या ‘सायकल गर्ल’ ज्योतीच्या पित्याचे निधन

दरभंगा : गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात सायकलवर वडिलांना घेऊन १३०० किमी गुडगांव ते दरभंगा असा प्रवास केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलेली सायकल गर्ल ज्योती पासवान हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्योतीच्या वडिलांच निधन झालं आहे.
सायकल गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेल्या ज्योतीचे वडील मोहन पासवान सोमवारी (31 मे ) हृदयविकाराच्या मरण पावले. ज्योतीच्या कुटुंबियांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, ज्योती पासवानच्या वडिलांच्या चुलत्याचे १० दिवसांपूर्वी निधन झाले होते. सोमवारी ते गावकऱ्यांसोबत चुलत्याच्या श्राद्धाविषयी चर्चा करत होते. चर्चा संपल्यानंतर मोहन पासवान बैठकीतून उठले आणि अचानक खाली कोसळले. त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये ज्योती चर्चेत आली होती. करोनाच्या भीतीमुळे अनेकांनी गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान शहरातून गावाकडे पलायन केले होते. त्यावेळी वडील मोहन पासवान यांना सायकलवर बसवून अवघ्या 13 वर्षांच्या ज्योतीने गुडगाव ते दरभंगा असा आठ दिवसाचा प्रवास करत घर गाठले होते. तिने 13 दिवसांत सायकलवर तब्बल 1300 किमीचा प्रवास पूर्ण केला होता. यामुळे ज्योती जागतीक पातळीवर चर्चेत आली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ज्योतीचे कौतुक केले होते.
दिल्लीमध्ये ज्योतीचे वडील मोहन पासवान यांचा जानेवारी 2020 मध्ये अपघात झाला होता. तेव्हा ज्योती वडिलांची देखभाल दिल्लीत आली होती. त्याचवेळी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. रोजगार बंद झाल्यामुळे खाण्यापिण्याची मोठी समस्या निर्माण झाली. या परिस्थितीत केवळ 500 रुपयांमध्ये एक सायकल खरेदी करून ज्योतीने तिच्या वडिलांना घेऊन सायकलवर दरभंगा येथे आणले होते.





