प्रभात वृत्तसेवा पुणे – सायबर फसवणुकीच्या एका भयावह घटनेने पुणेकरांना हादरवले आहे. सीबीआयच्या नावाने अटकेची भीती दाखवत सायबर चोरट्यांनी एका ८० वर्षीय ज्येष्ठ महिलेकडून तब्बल एक कोटी १९ लाख रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या धक्क्यामुळे पीडित महिलेच्या पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर महिनाभरानंतर सावरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेत न्याय मागितला.शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार १६ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्यांनी स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून सादर केले. व्हिडिओ कॉलद्वारे महिलेशी पोलीस गणवेशातील अधिकाऱ्याने संवाद साधला. तुमच्या बँक खात्यात काळा पैसा व्यवहार झाला आहे. सीबीआय तपास करत आहे, अटक होऊ शकते. अटक टाळायची असेल तर तातडीने पैसे जमा करा, अशी भीती दाखवली. महिलेने आपल्या आयुष्यभराची सर्व बचत, गुंतवणूक आणि दागदागिने विकून चोरट्यांच्या खात्यात एक कोटी १९ लाख रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी आपले सर्व संपर्क क्रमांक बंद केले. धक्क्याने पतीचा मृत्यू.. फसवणुकीमुळे आर्थिकदृष्ट्या कोलमडलेल्या या दांपत्याकडे डॉक्टरांची फी भरण्यासाठीही पैसे उरले नव्हते. उपचारासाठी गेलेल्या तिच्या पतीचा तिथेच हृदयविकाराने मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरण्यास महिलेला महिनाभर लागला. त्यानंतर तिने सायबर पोलिसांत तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. डिजिटल अरेस्टचा धसका.. फसवणुकीदरम्यान महिलेने बँक अधिकाऱ्यांना शाळेला देणगी द्यायची आहे, असं सांगून पैसे काढले. त्यातून तिच्यावर डिजिटल अटकेच्या भीतीचा किती खोल परिणाम झाला होता, हे स्पष्ट होते. वडिलांच्या निधनानंतर अमेरिकेतून परत आलेली मुलगी आईसोबत घडलेला प्रकार ऐकून हादरली. सायबर पोलिसांचे आवाहन.. कुठलीही सरकारी यंत्रणा नागरिकांकडून ऑनलाइन पैसे मागत नाही. सीबीआय, पोलीस किंवा बँकेकडून अटक टाळण्यासाठी पैसे मागितले जात नाहीत. अशा कॉल्सवर त्वरित १९३० या राष्ट्रीय हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे पोलिसांनी सांगितले.