Cyber Fraud : पुणे APMC पेट्रोल पंपावर सायबर डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी मॅनेजरनेच लावला चुना
Cyber Fraud : राजस्थानच्या आरोपीने पाठवलेला क्यूआर कोड वापरून सायबर फसवणुकीचे पैसे पंपाच्या खात्यात जमा; मॅनेजरसह तिघांवर गुन्हा.

Cyber Fraud – कमिशनच्या आमिषाला बळी पडत सायबर चोरट्यांना बँक खाते वापरायला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर उघडकीस आला आहे. या प्रकरणी पंपाच्या व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. केवळ ५० रुपयांच्या कमिशनसाठी हे बेकायदेशीर व्यवहार केले जात होते.
याप्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार पंपाचा व्यवस्थापक सुनील सुंदरराव मोरे ( ३१, रा. लोणी काळभोर, पुणे; मूळ रा. पोथरा, जि. बीड), मोहन भरत सोनार (रा. गुलटेकडी, पुणे) आणि करण चौधरी (रा. राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १६ मार्च ते २ मे दरम्यान घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी करण चौधरी याने मोरे याला पेट्रोल पंपाचा स्कॅनर पाठवण्यास सांगितले होते. त्याद्वारे तो पंपाच्या बँक खात्यावर पैसे पाठवत होता. त्यानंतर मोहन सोनार हा पंपावर येऊन खात्यात पैसे जमा झाले का, याची विचारणा करत असे. मोरे मोबाईलवरील मोबिक्विक ॲपवर व्यवहार तपासत असे. रक्कम जमा झाल्यानंतर पंपावरील रोख रक्कम सोनारला दिली जात होती. या व्यवहारासाठी दर १० हजारांमागे २०० रुपये कमिशन मिळत होते.
त्यापैकी ५० रुपये मोरे स्वतःकडे ठेवत होता, तर उर्वरित १५० रुपये इतर कामगारांमध्ये वाटप करत होता. मोरे याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या बँक खात्यात सायबर फसवणुकीतील तब्बल ७ लाख १९ हजार १३ रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे. याचा तपास मार्केट यार्ड पोलिस करत आहेत.
चेन्नई सायबर पोलिस तपासात सायबर चोरट्यांनी पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या बँक खात्यावर पैसे पाठवल्याचे समोर आले. त्यानंतर चेन्नई पोलिसांनी पाठवलेल्या पत्रानुसार संबंधित बँक खाते गोठविण्यात आले. तक्रारदार बँकेत व्यवहारासाठी गेल्यावर ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.






