प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे पोलिसांनी मे ते ऑक्टोबरदरम्यान उघडकीस आणलेल्या तीन बनावट कॉल सेंटर्सच्या तपासात मोठे गुन्हेगारी रॅकेट समोर आले आहे. या रॅकेटमधील संघटना परदेशातील (अमेरिका, युरोप) तसेच भारतातील डेटा सेंटरमधून नागरिकांचे संपर्क क्रमांक, ईमेल पत्ते मिळवून त्याच्या माहितीच्या आधारे परदेशातील नागरिकांची फसवणूक करत होते.पोलिसांच्या माहितीनुसार, या संघटना देशातील विविध शहरांतील स्थानिकांशी संपर्क करून भाड्याने जागा घेतात. तेथे कॉल सेंटर सुरू करतात. या कॉल सेंटरमधील एक्झिक्युटिव्ह नियमितपणे परदेशी नागरिकांना धमकीचे किंवा फसवणुकीचे कॉल करतात. काही आरोपींकडे क्रिप्टोकरन्सी खाते असून, ते नागरिकांना डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवून किंवा ऑनलाईन फसवणूक करून पैसे उकळत. ते पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये वर्ग करुन घेतात. यामुळे त्याचा माग लागत नाही. मे महिन्यात पुणे पोलिसांनी खराडी येथे धाड टाकून अमेरिकन नागरिकांना फसवणारे बनावट कॉल सेंटर उघडकीस आणले. या प्रकरणात पाचजणांना अटक केली असून १२३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर जुलै महिन्यात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) खराडीतील आणखी एका कॉल सेंटरवर छापा टाकून तिघांना अटक केली. याच मालिकेत १ ऑक्टोबर रोजी पुणे गुन्हे शाखेने हडपसर येथील कॉल सेंटरवर छापा टाकून आणखी एक फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आणले. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी याआधी नरायणगाव येथे ऑनलाइन बेटिंगद्वारे नागरिकांची फसवणूक करणारे सेंटर उघडकीस आणले होतेहे सर्व प्रकार एकमेकांशी संबंधित असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारी संघटनांचे जाळे यामागे असल्याची शक्यता गुन्हे शाखेचे उपआयुक्त निखिल पिंगळे यांनी व्यक्त केली.