Cyber Crime: १५० कोटींचा सायबर दरोडा! आळंदी पोलिसांकडून मोशीतील २५ वर्षीय तरुणाला अटक
Cyber Crime: ९ विविध बँकांतील खात्यांमधून फसवणुकीची रक्कम वळवली; आरोपी सचिन काळेने एटीएम अन् धनादेशाद्वारे पैसे काढल्याची दिली कबुली.

Cyber Crime – देशातील विविध राज्यांतील 65 नागरिकांची तब्बल 150 कोटी रुपयांची सायबर फसवणूक करणार्या टोळीतील एका संशयिताला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. सचिन संजय काळे (वय 25, रा. मोशी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या सायबर सेलकडून ’म्युल’ बँक खात्यांची पडताळणी सुरू असताना आळंदी येथील कॉसमॉस बँकेतील एका खात्यात संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळून आले.
त्यानंतर आरोपीविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तपासादरम्यान आरोपीने विविध बँकांतील नऊ खात्यांच्या माध्यमातून सायबर फसवणुकीतून जमा झालेली रक्कम स्वीकारून ती एटीएम व धनादेशाद्वारे काढल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या खात्यावर सुमारे 1 कोटी 15 लाख रुपये जमा झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून सायबर रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके,
महिला पोलीस हवालदार आरती निकम तसेच पोलीस शिपाई सोळंके व जगताप यांच्या पथकाने केली. दरम्यान, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते किंवा सिम कार्ड वापरण्यास देऊ नये, कारण अशा खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम वळविण्यासाठी केला जात असल्याचे आवाहन आळंदी पोलिसांनी नागरिकांना केले आहे.





