Alandi News: आळंदीकरांनो सावधान! भामा आसखेडचे पाणी येतंय गढूळ; नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन
Alandi News: भामा आसखेड जलस्रोतामधून आळंदी शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत; जलशुद्धीकरण केंद्रानंतरही गढूळ पाणी येत असल्याने प्रशासन चिंतेत.

Alandi News – आळंदी शहरातील नागरिक तसेच यात्रेच्या निमित्ताने शहरात आलेले भाविक, वारकरी आणि विविध धर्मशाळांमध्ये वास्तव्यास असलेल्या भक्तांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून घ्यावे, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्यातील गढूळपणा वाढला असून, संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
लोणावळा येथे उगम पावणारी इंद्रायणी नदी तुळापूर येथील त्रिवेणी संगमात विलीन होईपर्यंत विविध तीर्थक्षेत्रे, बाजारपेठांची गावे तसेच औद्योगिक क्षेत्रातून वाहते. या प्रवासात नदीपात्रात विविध प्रकारचे सांडपाणी तसेच औद्योगिक क्षेत्रातील रसायनमिश्रित दूषित पाणी मिसळत असल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे नदीचे पाणी पिण्यासाठी वापरता येत नसल्याने आळंदी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भामा आसखेड धरणातून होणार्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते.
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नागरिकांनी नगरपरिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असल्याने पाण्यामुळे होणार्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जलशुद्धीकरणानंतरही गढूळपणा कायम
सध्या भामा आसखेड जलस्रोतामधून मिळणारे पाणी अत्यंत गढूळ स्वरूपात येत आहे. आळंदी येथील जलशुद्धीकरण केंद्रात या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरणानंतरच नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र तरीही पाण्याचा गढूळपणा पूर्णपणे कमी होत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





