Alandi Police : 150 कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीला आळंदी पोलिसांकडून अटक
Alandi Police : देशातील विविध राज्यांतील ६५ नागरिकांची तब्बल १५० कोटी रुपयांची ऑनलाइन गुंतवणूक व इतर सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका संशयिताला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे.

Alandi Police : देशातील विविध राज्यांतील ६५ नागरिकांची तब्बल १५० कोटी रुपयांची ऑनलाइन गुंतवणूक व इतर सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका संशयिताला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. सचिन संजय काळे (वय २५, रा. गोडाऊन चौकाजवळ, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या सायबर सेलकडून म्युल (Mule) बँक खात्यांची पडताळणी सुरू असताना आरोपीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. तपासात आरोपीने कॉसमॉस बँकेच्या आळंदी शाखेतील बचत खात्याचा वापर ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी केल्याचे उघड झाले.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७४/२०२६ आणि २८३/२०२६ असे दोन गुन्हे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११२(२), ६१(१), ३१८(४) आणि ३(५) अन्वये दाखल करण्यात आले आहेत.
तपासादरम्यान आरोपीने स्वतःच्या नावाने विविध बँकांमध्ये एकूण नऊ बँक खाती उघडल्याचे समोर आले. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीतून आलेली रक्कम जमा करून ती एटीएम व धनादेशाद्वारे काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
देशातील विविध राज्यांतील ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी आरोपी सचिन काळे याच्या नऊ बँक खात्यांमध्ये सुमारे १ कोटी १५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त मारुती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके, महिला पोलीस हवालदार आरती निकम तसेच पोलीस शिपाई सोळंके व जगताप यांच्या पथकाने केली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते किंवा सिमकार्ड वापरण्यास देऊ नये. तसेच ऑनलाइन व्यवहाराच्या नावाखाली इतरांच्या खात्यातून पैसे स्वीकारून ते एटीएम किंवा धनादेशाद्वारे काढून देऊ नयेत. अशा व्यवहारांमधील रक्कम सायबर फसवणुकीशी संबंधित असू शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.





