सायबर हल्ल्यामुळे युरोपातील विमान वाहतूक विस्कळीत

ब्रुसेल्स (बेल्जियम) – विमान सेवेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे आज युरोपातील प्रमुख विमानतळांवरील उड्डाण सेवा विस्कळीत झाली. ब्रुसेल्स, लंडनमधील हीथ्रो आणि बर्लिन विमानतळांवरील अनेक विमानांची उड्डाणे आज उशीराने झाली किंवा काही विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. या विमानतळांवरील चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली.
या ऍटोमॅटिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचे शुक्रवारी संध्याकाळी उशीरा ध्यानात आले होते. त्यामुळे चेक-इन आणि बोर्डिंग मनुष्यबळाच्या आधारे करावे लागले. बोर्डिंग सिस्टीममधील तांत्रिक बिघाड युरोपातील बहुतेक विमानतळांवर होत असल्याचे आढळून आले. हा प्रकार सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीवरील सायबर हल्ल्यामुळे झाला होता, असे ब्रुसेल्सच्या विमानतळाने म्हटले आहे.
सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी ही समस्यो सोडवण्यासाठी सक्रिय झाली असून प्रवाशांना विमानतळावर येण्यापुर्वी आपल्या विमान कंपनीकडून वेळापत्रक पडताळून बघण्याची सूचना करण्यात आली आहे. आपल्या देशांतर्गत प्रवासाच्या नियोजित वेळापत्रकापुर्वी दोन तास आगोदर आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या किमान ३ तास आगोदर यावे असेही प्रवाशांना सांगण्यात आले आहे.
कॉलिन्स एरोस्पेस या जागतिक पातळीवरील कंपनीकडून अनेक विमान कंपन्यांना चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टम उपलब्ध करून दिली जाते. त्यांना या व्यत्ययाशी संबंधित तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत आहे, असे लंडनमधील हीथ्रो विमानतळाने सांगितले. हीथ्रो विमानतळानेही सर्व प्रवाशांना किमान २ ते ३ तास आगोदर विमानतळावर येण्याची सूचना केली आहे.
बर्लिन विमानतळाने चेक-इन करताना जास्त वेळ वाट पाहण्याची तक्रार केली, युरोपभर कार्यरत असलेल्या सिस्टम प्रोव्हायडर मधील तांत्रिक समस्येचे निराकारण लवकरच केले जात असून तांत्रिक टीम जलद उपाय शोधण्यासाठी काम करत आहे, असेही विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ही समस्या कधीपर्यंत दूर होईल, याचा कोणताही अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही.





