Cyber Attack! “मुस्लिम धर्मियांची माफी मागा”; देशातील अनेक सरकारी वेबसाईट ‘या’ हॅकर्स ग्रुपकडून हॅक

नवी दिली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद देशात आणि देशाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात पडताना दिसत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचे परिणाम आता सरकारी कामावरही होताना दिसून येत आहेत. कारण देशातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे कनेक्शन या सर्व प्रकरणाशी जोडण्यात ये आहे कारण देशात हॅक झालेल्या वेबसाईटवर माफी मागण्याचा संदेश देण्यात आला आहे. मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नुपूर शर्मा यांचे वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे. “मुस्लिम धर्मियांची माफी मागा” हाच संदेश या वेबसाईटवरून देण्यात आला आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “या ग्रुपनं ‘opspatuk’ हे ऑपरेशन सुरू केले आहे. त्याचा अर्थ स्ट्राईक बॅक असा होतो. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
“मुस्लिम धर्मियांची माफी मागा” हाच एक संदेश सर्व वेबसाईटवर देण्यात येत आहे. यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.




