CWG 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2026) महाराष्ट्राचा सुपुत्र आणि नाशिकचा स्टार ॲथलीट सर्वेश अनिल कुशारे याने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले आहे.

CWG 2026 : ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2026) महाराष्ट्राचा सुपुत्र आणि नाशिकचा स्टार ॲथलीट सर्वेश अनिल कुशारे याने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले आहे. पुरुषांच्या उंच उडी या क्रीडा प्रकारात सर्वेशने २.२५ मीटर उंच उडी मारत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (CWG 2026) इतिहासात पुरुषांच्या उंच उडीत रौप्यपदक जिंकणारा सर्वेश हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी बर्मिंगहॅम २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्वी शंकरने २.२२ मीटर उडी मारून कांस्यपदक जिंकले होते, ज्यानंतर आता सर्वेशने पदकाचा रंग बदलत भारतासाठी नवीन इतिहास रचला आहे.
या स्पर्धेतील (CWG 2026) सुवर्णपदकाची शर्यत अत्यंत अटीतटीची आणि रोमांचक ठरली. सर्वेश आणि जमैकाचा खेळाडू रोमेन बेकफर्ड हे दोघेही शेवटपर्यंत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आमनेसामने होते. दोघांनाही २.२८ मीटर उंचीचे आव्हान पार करता आले नाही, कारण सर्वेशचे २.२८ मीटरसाठीचे तिन्ही प्रयत्न अपयशी ठरले.
Congratulations to Sarvesh Kushare on winning the Silver Medal in the High Jump at the Glasgow Commonwealth Games 2026.
He displayed exceptional composure, technique and competitive spirit on the international stage. His performance is a testament to the growing strength of… pic.twitter.com/h8d4827dId
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 28, 2026
अखेर खेळाच्या ‘काऊंटबॅक’ नियमानुसार पदकाचा निर्णय झाला. रोमेन बेकफर्ड याने २.२५ मीटरची उडी पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पूर्ण केली होती, त्यामुळे त्याला सुवर्णपदक जाहीर झाले, तर सर्वेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत २.२० मीटर उंच उडी मारणारा इंग्लंडचा किमानी जॅक कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा फडकवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील देवगावच्या या खेळाडूचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी राहिला आहे. ग्रामीण भागात उंच उडीसारख्या खेळासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची गादी उपलब्ध नसल्याने सुरुवातीला सर्वेशच्या सरावावर अनेक मर्यादा येत होत्या. परंतु, सर्वेशच्या जिद्दीला त्याच्या प्रशिक्षकांची आणि कुटुंबाची मोलाची साथ मिळाली.
प्रशिक्षक जाधव यांनी सर्वेशच्या वडिलांच्या मदतीने सरावासाठी एक देशी जुगाड शोधून काढला. त्यांनी मक्याचा भुस्सा, जुने कपडे आणि कापूस यांचा एकत्र वापर करून सरावासाठी एक कामचलाऊ गादी तयार केली. याच गादीवर जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेशने अहोरात्र कठोर सराव केला. जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीची छाप पाडल्यानंतर, याच अपार कष्टाच्या जोरावर सर्वेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात (CWG 2026) भारताची मान अभिमानाने उंचवली आहे.






