Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर
Maharashtra Rain: गोदाकाठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली

Maharashtra Rain: राज्यात मागील आठवडाभरापासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. यातच आता पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जुलै महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्रमुख आणि मध्यम सिंचन प्रकल्पांमधील जलसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे.
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर घाटमाथा व किनारपट्टीच्या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर 29 जुलै पर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने बळीराजाने आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Maharashtra Rain)
विदर्भातील भंडारा, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Rain)
नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर (Maharashtra Rain)
तसेच धाराशिव, बीड, धुळे, नंदुरबार , परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत तसेच नाशिक घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीची पुरस्थिती सलग पाचव्या दिवशीही कायम आहे. गोदाकाठावरील अनेक मंदिरे अद्याप पाण्याखाली असून दुतोंड्या मारुती मंदिरातील मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी आहे.
ऑरेंज अलर्ट जारी (Maharashtra Rain)
तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कोल्हापूरमध्ये, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
तसेच मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा:





