#CWC23 #SAvNED : ….त्यामुळे आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो – स्कॉट एडवर्ड

मुंबई – आमच्या संघात भलेही अनुभवाची कमतरता असेल पण जिद्द आहे व त्याच जोरावर आम्ही दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करू शकलो. हा केवळ फ्लीक नसून आमच्या संघात लढत देण्याची वृत्ती आहे व त्याच जोरावर येत्या काळात आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, असा विश्वास नेदरलॅंडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड (Scott Edwards) याने व्यक्त केला आहे.
यंदाच्या स्पर्धेत अखेरपर्यंत स्थान टिकवून ठेवण्याचेच आमचे उद्दिष्ट आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये पूर्ण डाव संपण्यापूर्वीच आमचे फलंदाज बाद होत होते. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत मी खेळपट्टीवर टिकून राहण्याचा विचार केला आणि मला दुसऱ्या बाजूने चांगला पाठिंबा देखील मिळाला म्हणूनच आम्ही एवढी मोठी धावसंख्या उभारू शकलो.
रोलेफसह फलंदाजी करताना संघाला विजय मिळेल अशी धावसंख्या उभारण्यासाठीच जिद्दीने फलंदाजी केली. मला आमच्या संघाचा अभिमान आहे.आम्ही यंदाच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. मात्र, त्यासाठी आम्हाला बलाढ्य संघांना पराभूत करावे लागेल, असेही तो म्हणाला.
या सामन्याची खास गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्याच माजी खेळाडूने त्यांच्याच संघाला पराभूत केले. रोलेफ वॅन डर मर्व मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. मात्र, आता तो नेदरलॅंडकडून खेळत आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आजच्या सामन्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याने 19 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रोलेफने दक्षिण आफ्रिकेकडून कारकिर्दीत 29 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील 17 सामन्यांमध्ये संघ जिंकला, तर 10 सामन्यात पराभूत झाला आहे.
THE NETHERLANDS WIN BY 38 RUNS!🇳🇱
A FAMOUS DUTCH VICTORY THAT WILL BE REMEMBERED FOR A LIFETIME!!!
The Dutch aren’t just here to make up the numbers but to show the world they deserve a spot on the big stage!
WHAT A GAME, WHAT A WIN, WHAT A TEAM!🍊#CWC23 #SAvNED #SAvsNED
— Netherlands Cricket Insider (@KNCBInsider) October 17, 2023
नेदरलँड्सचा बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर विजय..
एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 15व्या सामन्यात (17 आॅक्टोबर) नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला. या विश्वचषकातील हा दुसरा मोठा उलटफेर ठरला. यापूर्वी अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात दोन्ही डावांतून प्रत्येकी सात षटके कमी करण्यात आली. अशा परिस्थितीत 43 षटकांच्या या सामन्यात नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट गमावून 245 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 42.5 षटकांत केवळ 207 धावाच करू शकला. यामुळे एकदिवसीय विश्वचषक 2023 इंग्लंडपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा संघही उलटफेरचा बळी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. आफ्रिकेचा या विश्वचषकातील तीन सामन्यांतील हा पहिलाच पराभव आहे. याआधी या संघाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.





