#CWC23 #INDvBAN : पुणे स्टेडिअमवर Team India चा रेकॉर्ड कसा? जाणून घ्या…ODI मधील आकडेवारी

World Cup 2023 IND vs BAN : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील प्रचंड भरात असलेला भारतीय संघ पुणे येथे होत असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत सलग चौथा विजय साकार करण्यासाठी सज्ज बनला आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताने सलग तीन सामने जिंकत उपांत्य फेरीकडे कूच केलेली आहे. पहिल्या लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवल्यावर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. त्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही पराभूत केले.
पुण्याच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पहिल्यांदाच आमनासामना होत आहे. या मैदानावर भारत आणि बांगलादेश वनडे फॉरमॅटमध्ये आमनेसामने आलेले नाहीत. तर या सामन्यापूर्वी, आम्ही तुम्हाला टीम इंडियाच्या पुण्यातील रेकॉर्डबद्दल सांगणार आहोत की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये टीम इंडियाची एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी कशी आहे…
टीम इंडियाने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आजपर्यंत एकूण 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने 4 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. टीम इंडियाने आपला शेवटचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 2 वर्षांपूर्वी मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता, जो टीम इंडियाने 7 धावांनी जिंकला होता.
2013 मध्ये या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना झाला होता. ऑस्ट्रेलियाने भारताचा 72 धावांनी पराभूत केले होते. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघाने पुण्याच्या मैदानावर भारताचा पराभव केला आहे. पुण्याच्या मैदानावर भारतीय संघाची सर्वोत्तम धावसंख्या सात बाद 356 इतकी आहे. तर न्यूझीलंडला 230 धावांत रोखले आहे.
पुणे स्टेडिअमवर भारताचा रेकॉर्ड
13/10/2013 भारत वि आॅस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 72 धावांनी विजयी
15/01/2017 भारत वि. इंग्लंड भारत 3 विकेट्सनी विजयी
25/10/2017 भारत वि. न्यूझीलंड भारत 6 विकेट्सनी विजयी
27/10/2018 भारत वि. वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज 43 धावांनी विजयी
23/03/2021 भारत वि. इंग्लंड भारत 66 धावांनी विजयी
26/03/2021 भारत वि. इंग्लंड इंग्लंड 6 विकेट्सनी विजयी
28/03/2021 भारत वि. इंग्लंड भारत 7 धावांनी विजयी
दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात 35 वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत एकूण 40 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने 31 एकदिवसीय सामने जिंकले आणि बांगलादेशने 8 सामने जिंकले, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.
भारत विरूध्द बांगलादेश (एकदिवसीय सामने)
एकूण सामने – 40
भारत विजयी – 31
बांगलादेश विजयी – 8
अनिर्णित – 1
एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत, यामध्येही टीम इंडियाचे वर्चस्व राहिलेले आहे. भारताने 3 सामने जिंकले आहेत तर बांगलादेश संघाला केवळ एका सामन्यात भारताचा पराभव करण्यात यश आले आहे.
भारत विरूध्द बांगलादेश (एकदिवसीय सामने, विश्वचषक)
एकूण सामने – 4
भारत विजयी – 3
बांगलादेश विजयी – 1विश्वचषक 2007 : बांगलादेश 5 गडी राखून विजयी
विश्वचषक 2011 : भारत 87 धावांनी विजयी
विश्वचषक 2015 : भारत 109 धावांनी विजयी
विश्वचषक 2019 : भारत 28 धावांनी विजयी
मैदानावर सर्वाधिक शतकेही विराटचीच…
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या मैदानावर विराट कोहलीनेच सर्वाधिक शतकेही झळकावली आहेत. पुण्यातील या मैदानावर विराटने सात डावांत सर्वाधिक 448 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 37 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. या मैदानावर विराटने एकूण 2 शतके झळकावली आहेत. पुण्यातील या मैदानावर विराटची फलंदाजीची सरासरी 66.00 आहे, याशिवाय त्याचा स्ट्राईक रेट 91.99 आहे. त्याने दोन डावात अर्धशतकेही झळकावली आहेत.





