#CWC2023 World Cup2023 : विजेता संघ होणार मालामाल, मिळणार ‘इतकी’ रक्कम….

World Cup Final 2023 Ahmedabad : भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर आली आहे. यजमान भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातच या स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून विजेता, उपविजेता तसेच साखळीत आणि उपांत्य फेरीतील विजेत्या संघांना मोठी रक्कम दिली जाणार आहे. त्यातही स्पर्धेचा विजेता संघ तर मालामाल होणार आहे.
यंदाच्या स्पर्धेच्या विजेत्या संघाला तब्बल 40 लाख डॉलर्स (जवळपास 33 कोटी रुपये) मिळतील. उपविजेत्या संघाला विजेत्यांपेक्षा निम्मी रक्कम मिळते. उपांत्य फेरीत दाखल झालेल्या संघांनाही मोठी रक्कम मिळणार आहे. साखळी फेरीतील प्रत्येक विजयासाठी 40 हजार डॉलर मिळतील.
उपांत्य फेरीतून बाहेर पडलेल्या न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेने साखळीत 7 विजय नोंदवले होते. यामुळे त्यांना प्रत्येक सामन्याचे 40 हजार डॉलर म्हणजेच 2.80 लाख डॉलर्स (जवळपास 2 कोटी 24 लाख रुपये) मिळतील. त्या शिवाय उपांत्य फेरीत पोहोचल्याचे जास्तीचे 8 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 6 कोटी रुपये त्यांना मिळणार आहेत. दक्षिण आफ्रिकेलाही जवळपास 8 कोटी मिळतील.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत आणि 20 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून विजय मिळवला. अशा परिस्थितीत चाहत्यांना रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. स्पर्धेत आतार्यंत सलग 10 विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाची नजर आता विश्वचषकावर आहे.





