‘एक मुलगा सपामध्ये तर दुसरा भाजपात, तरीही कॉंग्रेसने केले शहराध्यक्ष’; भर अधिवेशनात पक्षाच्या नेत्यानेच नियुक्त्यांवर विचारला प्रश्न

अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज उत्तर प्रदेश काँग्रेस नेते आलोक मिश्रा यांनी त्यांच्याच पक्षाच्या नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित केले. पक्षाने एका अशा व्यक्तीला शहराध्यक्ष बनवले आहे, ज्यांचा एक मुलगा समाजवादी पक्षात आहे आणि दुसरा नेता भारतीय जनता पक्षात आहे. अशी खळबळजनक माहिती त्यांनी उघड केली.
विशेष म्हणजे आलोक मिश्रा जेंव्हा हे बोलत होते त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी टाळ्या वाजवत असल्याचे आश्चर्यकारक चित्र दिसून आले. तथापि, आलोक मिश्रा कोणाला लक्ष्य करत होते हे स्पष्ट झाले नाही.
भाषणादरम्यान आलोक मिश्रा म्हणाले, १९८२ पासून काँग्रेसमध्ये असलेला मी एक कार्यकर्ता आज काँग्रेससाठी ओरडतो आणि तुम्हाला आवाहन करण्यासाठी आलो आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीशी नंतर लढू; मात्र काँग्रेसी आपापसातच भांडतात. जो काही निर्णय येईल तो आपण आनंदाने स्वीकारू हे अगोदर निश्चित केले पाहिजे.
आम्ही आपापसात लढणार नाही आणि काँग्रेसला सत्तेत आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पण राहुल आणि खर्गे जी, यांना मला एक विचारायचे आहे की तुम्हाला कॉंग्रेसमधील भाजपवाल्यांना काढायचे आहे. जर असे असेल तर मी तुम्हाला विचारू इच्छितो की, ज्या शहराध्यक्षाचा एक मुलगा सपामध्ये आणि एक मुलगा भाजपमध्ये आहे, तो कॉंग्रेसचा शहराध्यक्ष होण्यास पात्र आहे का?
मिश्रा म्हणाले, जर असं असेल तर आम्ही तुम्हालाही स्वीकारतो. पण मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही मला संधी दिली. कानपूरमध्ये आम्हाला ४ लाखांहून अधिक मते मिळवण्याची संधी मिळाली, जी आम्हाला १९४७ पासून मिळाली नव्हती. मी आज तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे की जो कोणी शहराध्यक्ष असेल, त्याने निवडणुकीसाठी अर्ज करणार नाही तर फक्त संघटनेसाठी काम करेल. हे तुम्हीच ठरवा, नाहीतर प्रत्येक नगराध्यक्ष आणि प्रत्येक जिल्हाध्यक्ष निवडणूक उमेदवार बनतील.





