“सध्या भाजपचे कॉंग्रेसीकरण चालले…’; जयंत पाटील यांचं खळबळजनक विधान

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असून एक गट बंडाच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू असतानाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सूचक विधान केले आहे. हे सगळे भाजपमध्ये येऊन भाजपचे कॉंग्रेसीकरण चालले आहे. भाजपचे बिचारे नेते मागच्या बाकावर आहेत आणि आमच्यातून गेलेले पहिल्या बाकावर दिसत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
एकनाथ शिंदेंचे तिकडे गमन झाले त्यावर लोकांची जी प्रतिक्रिया आहे, ती आपण समाजात बघतो. आता आणखी काही गमनं झाली तर त्याची प्रतिक्रिया काय येईल, याचा परिणाम भाजपवर काय होईल? असा सवालही त्यांनी विचारला. येत्या काळात गमनं होतील का? असा प्रश्न विचारला असता, मीडियामध्ये जे येतं ते आम्ही वाचतो, आम्हाला काही माहिती नाही. तुम्ही एक-दोन हजार व्यक्तींचा सर्व्हे केला तर भाजपचं रेटिंग फार खाली गेले आहे, असे उत्तर त्यांनी दिले.
2019 ला माणूस थांबायला तयार नव्हता, दिसेल तो माणूस तिकडे निघाला होता. निवडणुकांनंतर आम्ही 54 आणि कॉंग्रेस 44 वर गेली. आमचे 98-100 आमदार निवडून आले, याची आठवणही जयंत पाटलांनी करून दिली. लोकांना गृहित धरून राजकारण करायला लागलो, तर ते राजकारण फेल व्हायला लागते, असे जयंत पाटील म्हणाले.





