राखीच्या धाग्यात जपला संस्कृतीचा वारसा; त्रिमूर्ती महाविद्यालयात पर्यावरणपूरक उपक्रमाचा उत्साह

नेवासा : त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्ती नगर, नेवासा फाटा येथे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ‘राखी बनवणे हा उपक्रम थाटामाटात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी दोरे, मोती आणि शोभेच्या वस्तूंनी सजवलेल्या आकर्षक राख्या तयार करत सर्जनशीलता, सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचा सुंदर संगम घडवला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वदेशी आणि पर्यावरणपूरक राख्या बनवून ‘आपला सण – आपले उत्पादन’ हा संदेश दिला. महाभारतातील द्रौपदी-श्रीकृष्ण आणि राणी कर्णावती-हुमायूँच्या प्रेरणादायी कथांनी रक्षाबंधनाच्या सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. या कथा सांगताना हा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नसून विश्वास, संरक्षण आणि ऐक्याचे प्रतीक असल्याचे अधोरेखित झाले.
प्राचार्य डॉ. चांगदेवराव आरसुळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “रक्षाबंधनाचा अर्थ आज समाजातील सर्वांच्या सुरक्षेसाठी आणि ऐक्यासाठी विस्तारित झाला पाहिजे.” महाविद्यालयाच्या समन्वयिका डॉ. गोरे, उपप्राचार्या निकिता बर्गे, त्रिमूर्ती फार्मसीच्या प्राचार्या डॉ. अनाप, त्रिमूर्ती बी.एड.च्या प्राचार्या डॉ. भंगाळे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाच्या विशेष मेहनतीने आणि सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा उपक्रम अविस्मरणीय ठरला.





