Nevasa News: जागतिक ग्राहक दिनानिमित्त नेवासा येथे रविवारी (दि. १५) आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ग्राहक दिन कार्यक्रमात विविध खात्यांचे अधिकारीच गैरहजर राहिल्याने या कार्यक्रमाचा पुरता फज्जा उडाला. या प्रकाराबद्दल ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमास नेवासा तहसीलदार व त्यांचे कर्मचारी वगळता इतर कोणताही अधिकारी उपस्थित राहिला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राकडे अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. वीज वितरण, कृषी, आरोग्य, एस.टी. महामंडळ, महसूल, बँक, भूमी अभिलेख, पेट्रोल पंप या विभागांबाबत ग्राहकांच्या नेहमीच तक्रारी असतात. मात्र संबंधित अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने या बैठकीत एकाही तक्रारीचे निराकरण होऊ शकले नाही. नियोजनाचाच अभाव – पूर्वी कार्यक्रमाच्या किमान पंधरा दिवस आधी ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीतून नियोजन केले जात असे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून अशी कोणतीही पूर्वतयारी न करता अचानकपणे कार्यक्रम जाहीर केला जातो. कोणत्याही सदस्याला किंवा संघटनेला विश्वासात न घेतल्यामुळेच या कार्यक्रमाची ही अवस्था झाल्याचे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दर महिन्याच्या बैठकाही बारगळतात – ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांची बैठक दर महिन्याला घेण्याचे ठरलेले असतानाही वेगवेगळी कारणे सांगून त्या सातत्याने पुढे ढकलल्या जातात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या परिषदेच्या बैठकांना अपेक्षित वेळ आणि महत्त्व दिले जात नसल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली. वरिष्ठांकडे तक्रार करणार – या उदासीनतेबद्दल लवकरच वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून जिल्ह्यातील ग्राहकांच्या प्रश्नांकडे होणाऱ्या दुर्लक्षाची माहिती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली जाईल, तसेच वरिष्ठांची भेट घेऊन याबाबत औपचारिक तक्रार केली जाईल, असे सदस्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमास मध्य महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष विलास जगदाळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी, प्रांत सदस्य अतुल कुऱ्हाडे, सचिव दिनेश थोरात, महिला अध्यक्ष अमिता कोहली, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, परिषद सदस्य अशोक शेवाळे, उमा मेहत्रे, डॉ. रजनीकांत पुंड, रामकृष्ण थोटे आदी उपस्थित होते.