Nevasa Accident : महामार्गावर रक्ताचा सडा! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; पती – पत्नी जागीच ठार
Nevasa Accident : छत्रपती संभाजीनगरहून लग्न उरकून परतणाऱ्या वाघमारे दांपत्याचा एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; नेवासे फाटा परिसरात हळहळ.

Nevasa Accident – अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गवरील सुरेशनगर शिवारात हॉटेल शिनाईसमोर कोल्हापूरला जाणाऱ्या बसने ( एमएच 14 एम.एच.4384) दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत माळीचिंचोरा (ता.नेवासे) येथील फिलिप दाविद वाघमारे व मार्याबाई फिलिप वाघमारे हे पती – पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.
नेवासे फाटा येथील पत्रकार राजेंद्र वाघमारे यांचे चुलते फिलिप वाघमारे, चुलती मार्याबाई वाघमारे हे जोडपे संपूर्ण कुटुंबीयांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे एका लग्न समारंभाला जाऊन आले. सायंकाळी 7वाजेच्या दरम्यान नेवासे फाटा येथून दुचाकीवरून माळीचिंचोरेकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर – कोल्हापूर बसची (एम.एच 14 एम.एच.4384)दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे हे जोडपे जागीच ठार झाले.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक विकास निपुंगे हे तत्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी अपघाताच्या घटनेमुळे गावं बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अतिशय मितभाषी आणि सुशिक्षित असलेले फिलिप वाघमारे आणि मार्याबाई वाघमारे यांचा स्वभाव अत्यंत स्पष्ट आणि प्रेमळ असल्यामुळे या दुर्दैवी अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गाव या अंत्यविधीत सहभागी झाले होते.




