Tripura – त्रिपुरामध्ये एका महिलेसोबत क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडण्यात आल्या. महिलेचे हातपाय बांधल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. तिला नाल्यावर झोपवण्यात आले. तिच्या चेह-याला काळे फासले. तिला बुटांचा हार घालण्यास भाग पाडण्यात आले आणि तिचे केस कापण्यात आले. स्थानिक भाजप नेत्याच्या सांगण्यावरून हा गुन्हा करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. ही घटना त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यातील भांगरपार भागात घडली. पीडित महिलेचे अवैध संबंध असल्याच्या आरोप असल्याने हे क्रूर वर्तन करण्यात आले, असे समजते. व्हायरल व्हिडिओमध्ये, स्थानिक सत्ताधारी पक्षाची नेता असलेली एक महिला पीडितेचे केस जबरदस्तीने कापताना दिसत आहे. जवळ उभे असलेले लोक त्यांच्या मोबाईलवर या अमानुष घटनेचे व्हिडिओ बनवत आहेत. पीडितेचा आरोप आहे की तिच्या सासूशी असलेल्या घरगुती वादामुळे परिसरातील लोकांनी तिला विजेच्या खांबाला बांधले आणि त्रास दिला. तिने यासाठी मंजू राणी दास, पुतुल राणी दास, निबेदिता चंदा, नंदिता चंदा, बापन बीबी आणि हमीदा बीबी यांना जबाबदार धरले आणि न्यायाची मागणी केली. गोमती पोलिसांनी आरकेपूर महिला ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १२७, ११७, ७६, ३५१ आणि ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. त्यांची नावे मंजू राणी दास (६०), पुतुल राणी दास (५०) आणि हमीदा बानो (६०) अशी आहेत. गोमती जिल्हा भाजप अध्यक्षा सबिता नाग यांनी एसपींची भेट घेतली आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, आमचा पक्ष आणि मुख्यमंत्री अशा कृत्यांना पाठिंबा देत नाहीत. महिला आयोगाचा हस्तक्षेप : या घटनेवर त्रिपुरा महिला आयोगाच्या अध्यक्षा झर्ना देबबर्मा यांनी मंगळवारी सांगितले की, एका निष्पाप आणि असहाय्य महिलेसोबत झालेल्या अशा अमानुष कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. जर कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी प्रशासनाकडे जाऊन योग्य ती कारवाई करावी. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. महिला आयोग दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो.