Pune District : माऊलींच्या जयघोषात दिवे घाट पार

पालखी सोहळ्याचे पुरंदर तालुक्यात स्वागत : लाखो वैष्णवांचा मेळा
दिवे-
पंढरीशी जावे ऐसे माझे मनी ! विठाई जननी भेटे केव्हा !! १ !!
नलगे त्याविण सुखाचा सोहळा ! लागे मज ज्वाळा अग्निचीया !! २ !!
तुका म्हणे त्याचे पहिलिया पाय ! मग दुख जाय सर्व माझे !! ३ !!
या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या ओव्या गात त्याचप्रमाणे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा, तुकाराम यांच्या नावाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर करीत लाखो वारकरी आनंदाने नाचत डोलत होते. अवघड आणि नागमोडी वळणाचा दिवेघाट उत्साहात पार करीत होते. नयनरम्य आणि सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण दिवे घाटात लाखो भाविक सकाळपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते. तो क्षण आला. लाखो भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि पुष्पवृष्टी करीत मोठ्या जल्लोषात स्वागत केले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाचे लाखो वारकऱ्यांसह भक्ती, शक्तीने माखलेल्या आणि संत सोपान देवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरंदरच्या पुण्यभूमीत मोठ्या उत्साहात आगमन झाले. यावेळी माउलींच्या आगमनाला साक्षात वरुणराजानेही हजेरी लावल्याने वारकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवार (दि.२२) सकाळी शिंदे छत्री येथे सकाळची आरती होवून विसावा झाला. दुपारचा नैवद्य हडपसर येथे दिल्यानंतर उरुळी देवाची, वडकी येथे काही काळ विश्रांती घेण्यात आली. दुपारी ४ वाजता आळंदी पंढरपूर मार्गावरील अवघड टप्पा असणाऱ्या नागमोडी वळणाच्या दिवे घाटाच्या चढणीस प्रारंभ करण्यात आला.
संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या ओव्या गात डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात टाळ, मृदुंग, मुखाने ज्ञानोबा तुकारामच्या नावाचा जयघोष करीत घाट पार करीत होते. त्यात वरुणराजाने भर घातली. सकाळपासूनच पावसाची अधून मधून सरी पडत होत्या. सायंकाळी चारनंतर मात्र उन्ह पडल्याने संपूर्ण घाटात वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर बेधुंद होवून नाचत होते. सायंकाळी साडेपाच वाजता संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे वैष्णवांसमवेत दिवे घाटातून पुरंदर तालुक्यात आगमन झाले. यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी आसुसलेल्या लाखो भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात पुष्पवृष्टी करीत आनंद व्यक्त करीत उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
पालखी सोहळ्याचे पुरंदर तालुक्यात आगमन होत झाल्यानंतर माऊलींच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्यासह भाविक उपस्थित होते.
दरम्यान, झेंडेवाडी गावच्या वतीने सरपंच वंदना खटाटे, उपसरपंच सोनाली झेंडे, माजी सरपंच पूनम झेंडे, शरद झेंडे, शिवाजी खटाटे, अमर झेंडे, कौशल्या झेंडे, ग्रामसेवक रश्मी सांगळे, पोलीस पाटील सारिका झेंडे यांच्यासह भाविक मान्यवर सोहळ्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सासवडच्या दिशेने सोहळा मार्गस्थ झाला. सासवडच्या मार्गावरील काळेवाडी, दिवे, पवारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दिंडी मालक आणि विणेकरी यांचे स्वागत केले. विविध सेवाभावी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने वारीतील भाविकांना फराळाचे पदार्थ, चहा वाटप, छत्र्या, रेनकोट वाटप करण्यात येत होते.
प्रशस्त घाट पाहून वारकरी सुखावले
यापूर्वी दिवे घाटाची रुंदी कमी असल्याने हजारो वारकऱ्यांना रस्त्याने चालताना त्रास होत होता. यंदा घाटाचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असून ७ मीटर वरून तब्बल २१ मीटर इतकी घाटाची रुंदी झाल्याने कोणताही अडथळा न येता हजारो वारकरी उत्साहात मार्गक्रमण करताना दिसून येत होते. घाटातील वनराई हिरवीगार दिसत असून डोंगरातून छोटेमोठे धबधबे वाहताना पाहून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
खासदार सुळेंकडून वारीचा आनंद
खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. वडकी पासून झेंडेवाडी पर्यंत दिवे घाटातून पायी चालत वारकऱ्यांसमवेत वारीचा आनंद घेतला. यावेळी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि टाळ मृदुंगाच्या तालात फुगडी खेळत आनंद लुटला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, राज्याच्या विविध भागातील आमदार, खासदार, विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या पोषाखात वारीला सुरक्षा देतानाच वारीचा अनुभवही घेतला.





