Crops Drying Up: पीक डोळ्यांदेखत सुकू लागलं! वाल्हे परिसरात पाऊस गायब; पुरंदरचा शेतकरी अस्मानी संकटात
Crops Drying Up: मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने पुरंदर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; रिमझिम पावसावर केलेल्या पेरण्या वाया जाण्याची भीती.

Crops Drying Up – यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊसाने वाल्हे व परिसरात दडी मारल्यानंतरही थोडाफार ओलीवर, पुढील काही दिवसांत पाऊस पडेल या आशेवर परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. मात्र, आता पावसाअभावी पेरलेले काही ठिकाणी उगवलं नाही.. तर काही शेतकऱ्यांची उगवलेली पिके सुकू लागल्याने पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे.
वाल्हे परिसरातील शेतकऱ्यांना नेहमीच अनेक समस्यांचा सामना करीत शेती करावी लागते; पाऊसपाणी, हवामान, हंगाम आणि शेतकरी यामध्ये एक अद्वैत नाते आहे. या नात्यांमध्ये आता दुरावा निर्माण होत आहे. यावर्षी ऐन पावसाळ्यात दुष्काळ सदृश स्थिती पहावयास मिळत आहे. मागील दोन वर्षीपूर्वी ओला दुष्काळ, तर कधी गारपीट आणि दुबार पेरणी हे स्वप्नभंग सोबत घेऊन परिसरातील शेतकरी वावरत, खुरडत आणि सरपटत राहत आहे.
अनेक वर्षांपासून जून महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात खरिपाची पेरणी केली जाते. मात्र, यावर्षी पावसाने दडी मारल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडलेला होता. रिमझिम पावसानंतर, शेतकरीवर्गाने, बाजरी, सोयाबीन, तूर, मूग आदींची पेरणी केली आहे. मात्र, अंकुर फुटल्यानंतर पाऊस पडलाच नाही. काही शेतकऱ्यांच्या विहिरी एखादा महिन्यापर्यंत तग धरले आहे. या पिकांना एखादे पाणी दिले जाईल.
त्यानंतर पावसाने ओढ दिल्यास पिके हातची करपून जातील. आता तळ गाठला आहे. त्यामुळे पिके करपून जाण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. जून महिना संपून जुलै महिनाही अर्धा संपला; तरीही तालुक्यात अनेक भागांत दमदार पाऊस पडला नाही. वाल्हे परिसरात सरासरीच्या जेमतेम या हंगामात, पाऊस झाला आहे. खरिपाची पेरणी ६७ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्या आहेत. पेरल्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे.

