Manchar : पाणीटंचाईमुळे पिके करपली; चाऱ्याचा प्रश्न गंभीर
Manchar : सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करणेही कठीण होत आहे.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे उजव्या कालव्याला तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील ४५ गावांतील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाअभावी पाणीटंचाई तीव्र झाली असून, काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतीतील पिके करपू लागली असून, विहिरी, कूपनलिका आणि पाझर तलाव कोरडे पडू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडल्यास परिसरातील शेतीला दिलासा मिळण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करणेही कठीण होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन कालव्याला तातडीने पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार आहे. याबाबत पंचायत समितीचे सदस्य निलेश टेमकर यांनी माहिती दिली. प्रशासनाने पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून होत आहे.
डिंभे उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या ४५ गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर होत आहे. पिके करपू लागली असून, पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कालव्याला तातडीने पाणी सोडण्यासाठी शिष्टमंडळ दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार आहे.
-निलेश टेमकर, सदस्य, आंबेगाव पंचायत समिती.





