Crop Damage: सोयाबीन, घेवड्याचं उत्पादन घटणार? वाई तालुक्यातील बळीराजाची चिंता वाढली
Crop Damage: उन्हाच्या चटक्यामुळे जमिनीतील ओलावा घटला; खरीप पिकांना तातडीने पाण्याची गरज असताना वाई तालुका सध्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत.

Crop Damage – वाई तालुक्यात खरीप हंगामातील पिके सध्या फुलोर्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ऊन, पावसाचा लपंडाव सुरू असून, पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता असताना पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला असून काही ठिकाणी पिके कोमेजण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील विविध भागांत यंदा खरीप हंगामात सोयाबीन, घेवडा, मूग, उडीद, वाटाणा यासह विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण आणि वाढ समाधानकारक झाली होती. त्यामुळे शेतकर्यांच्या उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, सध्या पावसाचा खंड पडल्याने या अपेक्षांवर चिंतेचे सावट आले आहे. सध्या सोयाबीन, घेवडा, मूग, उडीद, वाटाणा, भुईमूग ही पिके फुलोर्यात आली आहेत.
मात्र, पावसाने दडी मारल्यास फुलगळ होण्याची तसेच पुढील काळात शेंगा व दाणे भरण्यावर परिणाम होण्याची शक्यता शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेतकर्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी मोठा खर्च केला आहे. त्यामुळे पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळणे शेतकर्यांसाठी महत्त्वाचे आहे. पावसाने साथ दिली नाही तर उत्पादना बरोबरच शेतकर्यांच्या आर्थिक गणितावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सध्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.





