पिंपरी | येळसे गावात ‘पीक विमा पाठशाळा’ संपन्न

पवनानगर, (वार्ताहर) – येळसे गावात शुक्रवारी प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा पाठशाळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पीक विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एचडीएफसी एर्गोचे अधिकारी आझाद मिश्रा, सुभाषित गावित, योगेश परिहार, जिल्हा व्यवसथापक दत्तात्रय जगताप, पंकज साखरे, विजय घोरपडे, तुषार जगताप, कृषी सहायक विकास गोसावी, ग्रामसेवक मनोहर चांदगुडे, सी.एस.सी केंद्र संचालक तानाजी आडकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मावळ तालुक्यात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. शेतकरी भात लागवड वेगाने उरकत आहेत. परंतु आपल्या पिकाला विम्याचे सुरक्षा कवच असावे, असे सर्वच शेतकऱ्यांना वाटते आणि ते गरजेचे आहे. त्यामुळेच कृषी विभाग आणि पीक विमा कंपनी यांच्या मार्फत पीक विमा योजनेच्या प्रचार प्रसिद्धीचे काम चालू आहे. याचाच एक भाग म्हणून येळसे गावात पीक विमा पाठशाळा आयोजित करण्यात आली होती.
पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा या योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पीक विमा कसा भरावा, पीक विमा, फार्मर अँप मध्ये माहिती कशी भरावी याबाबत प्रात्याक्षिके दाखविले. कृषी सहाय्यक विकास गोसावी आणि पीक विमा कंपनी प्रतिनिधी तुषार जगताप यांनी नुकसान झाल्यावर करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले.





