उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका; कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर टीका करणे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला भोवले आहे. कुणाल कामरा याने एक व्हिडिओ बनवून शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. याच प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुणाल कामराला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी.
त्याचसोबत कुणाल कामराला दोन दिवसाचा आत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माफी मागावी, अन्यथा कुणाल कामराला मुंबईमध्ये फिरू देणार नाही, असा इशारा आमदार मुरजी पटेल यांनी दिला आहे. इतकेच नाही तर आम्ही कामराविरोधात एफआयआर दाखल केला आहे आणि डीसीपीकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. कामरा यांनी दोन दिवसांत माफी मागितली नाही, तर तो जिथे दिसेल तिथे शिवसैनिक त्याचे तोंड काळे करतील. असा इशाराही मुरजी पटेल यांच्याकडून देण्यात आला आहे.
काय म्हणाले मुरजी पटेल?
अधिवेशनात आज शिवसेना शिंदे गटाचे सर्व आमदार कुणाल कामरा विरोधात आंदोलन करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेणार आहे. यावेळी कुणालवर कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन देणार असल्याची माहिती ही आमदार मुरजी पटेल यांनी दिली आहे. कुणाल कामरा याने त्यांच्या विनोदी कार्यक्रमात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांवर अश्लील गाणी गायली होती. त्यावरून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संताप पसरला आणि त्यांनी कामरा यांच्या खार येथील कार्यालयाची तोडफोड केली आहे.
तर अजिबात सहन करणार नाही : उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बदनामीकारक गाणं असेल तर ते सहन करणार नाही, असा इशारा शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
कुनाल की कमाल!
जय महाराष्ट्र! https://t.co/U4Jxdo4dCm— Sanjay Raut (@rautsanjay61) March 23, 2025
काय म्हणाले होते कुणाल कामरा?
शिवसेना भाजप पक्षामधून बाहेर आली. पुढे शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. त्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. एका मतदाराला ९ बटन दिले. यामुळे सर्व संभ्रमात पडले. एकाने पक्ष चालू केला होता. ते खूप मोठा जिल्हा ठाणे, तिथून येतात, असा टोला कुणालने कवितेतून लगावला आहे. यांचे हे राजकारण आहे. त्यांना घराणेशाही संपवायची होती. त्यामुळे कुणाचा बाप चोरून घेतला.
आता काय रिप्लाय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का, त्याला सांगतो चल भाई जेवण करुयात. त्याच्या वडिलांचे कौतुक करतो आणि सांगतो, भाई तुझा बाप आजपासून माझा बाप, असा मिश्किल टोला कामराने लगावला. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. कुणाल कामराच्या कवितेनंतर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.





