Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा नववर्षात विक्रमी करार, वर्षाला मिळणार ‘इतके’ अब्ज रूपये

लंडन – पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने नववर्षाच्या पूर्वसंधेला सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे.
सूत्रांनी दिलेलया माहितीनुसार, ख्रिस्तियानो रोनाल्डोने नवीन क्लबसोबत 2025 पर्यंत करार केला आहे. रोनाल्डोला वर्षाला 200 दक्षलक्ष युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार वर्षाला 17 अब्ज रुपये मिळतील.
जे जगातील कोणत्याही खेळाडूचे सर्वात जास्त मानधन असेल. या अगोदर ख्रिस्तियानो रोनाल्डोने जुव्हेंटस सोडले आणि त्याचा माजी क्लब मॅंचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला होता. परंतु काही काळापूर्वी रोनाल्डोने वादानंतर हा क्लब सोडला.
करार केल्यानंतर रोनाल्डो म्हणाला, मी वेगळ्या देशात नवीन फुटबॉल लीग खेळण्यासाठी उत्सुक आहे. अल नासेरच्या कार्यपद्धतीची दृष्टी खूप प्रेरणादायी आहे आणि मला माझ्या नवीन सहकाऱ्यांशी जुडताना आनंद होत आहे. एकत्रितपणे आपण संघाला मोठे यश मिळवून देऊ शकतो, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.






