नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तसेच बीसीसीआयचे वैद्यकीय पथकही त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा पंत यंदा आयपीएल खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्त्व ऋषभ पंतकडे आहे. परंतु अपघातात दुखापत झाल्याने त्याचे खेळणे जवळपास अशक्यच आहे. अशा परिस्थितीमध्ये दिल्लीला पंतच्या जागी नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे. 2022 आयपीएल लिलावामध्ये दिल्लीने डेव्हिड वॉर्नरला आपल्या संघात सामील केले आहे. यामुळे संघाकडे डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे दोन कर्णधार पदासाठी चांगले पर्याय आहेत.
या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलसोबतच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे. आयपीएल 2014 ते 2021 पर्यंत डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद या संघाचा भाग होता.
ऋषभच्या प्रकृतीत सुधारणा
ऋषभ पंतच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिल्ली अँड डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनने दिली आहे. डीडीसीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ऋषभच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या उपचाराने आम्ही समाधानी आहोत. पंतला येथून हलवण्याचा निर्णय बीसीसीआय घेणार आहे. बीसीसीआयचे डॉक्टरही सतत संपर्कात आहेत. जर पंतला आणखी चांगल्या उपचारांची आवश्यकता असल्यास दुसरीकडे हलविले जाऊ शकते.
नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार – हिमंता बिस्वा सर्मा
दरम्यान, काल रात्री पंतच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. ज्यांचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे. मात्र, ऋषभ पंतच्या गुडघा आणि घोट्याचे एमआरआय स्कॅन अद्याप झालेले नाही. सध्या त्याच्या पायाला सूज असून वेदना होत असल्याची माहिती देण्यात आली.