काॅंग्रेसचे नाना पटोले – ठाकरे गटात उडाले ‘खटके’; महायुतीला होणार फायदा?

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेची जोरदार तयारी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवारांची नावे अंतिम करण्यात गुंतले आहेत. यावेळच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीत मुख्य लढत होणार असल्याचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत दोन्ही गटात मिळून चार पक्ष होते त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बंडखोरीमुळे आणखी दोन पक्ष उदयाला आले आहेत.
महायुतीत 3 आणि महाविकास आघाडीत 3 असे एकूण मुख्य सहा पक्ष निवडणुक मैदानात आहेत. पक्ष जास्त असल्यामुळे त्यांना जागावाटप करताना प्रमुख नेत्यांची मोठी कसरत होत आहे. अनेक भागात जागावाटपावरून दोन्ही आघाड्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात वादावादी होत आहे. एकाच जागेवर दोन पक्ष दावा करत आहेत.
अशातच महाविकास आघाडीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे गटात खटके उडत आहेत. ठाकरे गट नाना पटोले यांच्यावर नाराज आहे. याची तक्रारदेखील ते दिल्लीतील वरीष्ठांकडे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावेळी महायुतीला सत्तेतून बाहेर फेकण्याचा विडा उचललेल्या महाविकास आघाडीतील अंतर्गत वादावादीमुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा महायुतीतील पक्षाला होईल असे बोलले जात आहे.
नाना पटोलेंविरोधात ठाकरे गटाची भूमिका –
नाना पटोले यापुढे जागावाटपाच्या बैठकीत असल्यास शिवसेना ठाकरे गटाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका शिवसेना ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप हे नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे आडत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे.
विशेष म्हणजे याबाबत दिल्लीतील काँग्रेसकडे नाना पटोले यांची तक्रारही करण्यात येणार आहे. जागावाटपाची चर्चा ठाकरेंचे नेते हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी करत आहेत, तिढा असलेल्या जागा लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जावे, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेवरुन व सहभागावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचं स्पष्ट झाले आहे.
विदर्भातील वाढीव जागांसाठी ठाकरे गट आग्रही –
विदर्भातील वाढीव जागांसाठी ठाकरे गट आग्रही असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात जागा न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काल (गुरुवारी) झालेल्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे. जागा वाटपाची चर्चा पुढे जात नसल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेविरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. विदर्भातील काही जागांवर तिढा अद्याप सुटलेला नाही, विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर नाना पटोले अडून बसल्याची तक्रार ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक –
विधानसभा निडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशात जागांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा, असा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. मात्र, नाना पटोले यांची भूमिका जागावाटप पूर्ण करत असताना अडचण निर्माण करणारी आहे, असे म्हणत ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे हा विषय मांडला असल्याचे सुत्रांनी सांगितले. तसेच काँग्रेस हाय कमांडने तात्काळ निर्णय घेऊन जागावाटप पूर्ण करावे, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. त्यामुळे, आता पुढे काय होईल हे पाहणे महत्वाचे आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.





