उरुळीत सराईत गुन्हेगार जेरबंद

लोणी काळभोर -उरूळी कांचन (ता. हवेली) येथे झालेल्या खुनी हल्ल्यातील व एक महिन्यापासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगारास जेरबंद केल्याची माहीती पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
दत्ता उर्फ भावडया भिमा लोंढे (वय 30, रा. उरुळी कांचन ता.हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, दि. 7 मे 2020 रोजी रात्री सव्वादहा वाजता आकाश अशोक लोंढे (वय 23, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याबाबत फिर्यादी आकाश लोंढे याने हॉस्पीटलला उपचार घेत असताना दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
गुन्ह्यातील 6 आरोपींपैकी 5 आरोपी अटक असून मुख्य आरोपी दत्ता लोंढे हा फरार होता. आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात 13 गुन्हे दाखल आहेत.
तर गावातील मोलमजुरी करणारे तसेच फेरीवाले, हातगाडी, टपरीचालकांकडून दमदाटी करून फुकट खाणे, पैसे लुबाडणे असे प्रकार करीत असतो; परंतु त्याची परिसरात दहशत असल्यामुळे कोणी तक्रार देत नाही. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.





