543 नवनिर्वाचित खासदारांपैकी 251 खासदारांवर क्रिमिनल केस; ‘या’ पक्षाच्या नेत्यांवर सर्वाधिक गुन्हे

Criminal case | Lok Sabha Election 2024 – 18व्या लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागला आहे. 543 नवनिर्वाचित खासदारांपैकी 46% म्हणजेच 251 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 27 खासदारांना वेगवेगळ्या न्यायालयांनी दोषी ठरवले आहे.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार, कलंकित खासदारांची ही आजपर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. यापूर्वी 2019 मध्ये फौजदारी खटले असलेले 233 (43%) खासदार लोकसभेत पोहोचले होते.
251 नवनिर्वाचित खासदारांपैकी 170 जणांवर बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्ह्यांचे गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या 63, काँग्रेसच्या 32 आणि सपाच्या 17 खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या यादीत तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) 7, द्रमुकचे 6, तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) 5 आणि शिवसेनेच्या 4 खासदारांची नावे आहेत.
संसदेत पोहोचलेल्या सर्वाधिक कलंकित खासदारांबद्दल बोलायचे झाले तर, केरळच्या इडुक्की मतदारसंघातून काँग्रेसचे डीन कुरियाकोसे यांचे नाव आघाडीवर आहे. डीन 1.33 लाख मतांनी विजयी झाले आहेत.
त्यांच्यावर सुमारे 88 गुन्हे दाखल आहेत. या यादीत दुसरे नाव काँग्रेसचे शफी पारंबील यांच्यावर 47 केसेस आहेत आणि तिसरे नाव आहे भाजपच्या इटेला राजेंद्र यांचे, त्यांच्यावर 43 केसेस दाखल आहेत.
महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 15 खासदार
2024 च्या निवडणुका जिंकून लोकसभेत पोहोचलेल्या खासदारांपैकी 15 जणांवर महिलांवरील गुन्ह्यांचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी 2 जणांवर आयपीसी कलम 376 अंतर्गत बलात्काराचा आरोप आहे.
याशिवाय 4 खासदारांवर अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. 43 जणांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रांमध्ये द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित प्रकरणांचा उल्लेख केला होता.
विजयी खासदारांची यादी राष्ट्रपतींना सुपूर्द
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी सादर केली.
ही यादी राष्ट्रपतींकडे सादर झाल्यानंतर 18व्या लोकसभेच्या स्थापनेची औपचारिक प्रक्रिया सुरू होईल. याआधी बुधवारी राष्ट्रपतींनी 17वी लोकसभा बरखास्त करण्याचे आदेश दिले होते.





