धाराशिवमधील सव्वाशे आंदोलकांवर गुन्हे दाखल

धाराशिव – मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनानुसार जिल्हाभरात शनिवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यात शिवजयंती व विविध सण-उत्सवांमुळे जमावबंदी आदेश लागू असल्याने या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर जिल्हाभरातील सव्वाशेहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धाराशिव शहरात सांजा बस थांब्यावर बाजीराव सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे धाराशिव ते औसा जाणार्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अनेक प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान पोलिसांनी जमावबंदी आदेशाची आंदोलकांना कल्पना देवूनही आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने १० जणांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शिंगोली येथेही धाराशिव ते शिंगोली जाणारे रोडवर शासकीय विश्रामगृह येथे सगेसोयरेचा अध्यादेश व मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीकरीता सार्वजनिक रस्ता आडवून जिल्हा दंडाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अंमलदार हनुमंत जालिंदर म्हेत्रे यांच्या फिर्यादीवरून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





