Pune news : गणेश विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश!
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Pune news – गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील विजयपाल कवर सैन ( ३४) याला अटक करण्यात आली आहे.
त्याच्याकडून १३९.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, धारदार चाकू आणि लोखंडी कटर असा एकूण २१ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चैन चोरी आणि मंगळसूत्र चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गर्दीतील भाविकांना घेरून कटरने दागिने कापायचे!
पोलिसांच्या तपासात आरोपींच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा उलगडा झाला आहे. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील इस्लामपूर घसौली गावातील ही टोळी गर्दीची ठिकाणे, उत्सव आणि यात्रांमध्ये जाऊन भाविकांना लक्ष्य करीत होती. गर्दीचा फायदा घेत टोळीतील सदस्य एखाद्या भाविकाला सर्व बाजूंनी घेरत असत. त्यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लोखंडी कटरच्या साहाय्याने कापून चोरी केले जात होते.
विसर्जन मिरवणुकीत भाविकाला लुटले
फिर्यादी सागर प्रकाश कोमटी हे बुधवार चौक परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी उभे होते. यावेळी सहा अनोळखी व्यक्तींनी त्यांना लक्ष्य केले.आरोपींपैकी एकाने सागर कोमटी यांच्या पॅन्टच्या खिशातील निळ्या रंगाचा सॅमसंग मोबाईल काढून घेतला. त्यानंतर अन्य पाच जणांनी त्यांना पकडून मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत आरोपींनी लोखंडी कटरच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यातील ३८.३२० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन कापून घेतली.
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलीस हवालदार गजानन सोनुने आणि पोलीस अंमलदार चेतन होळकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील सहा जणांची टोळी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी विजयपाल कवर सैन ( ३४, रा. इस्लामपूर घसौली, जिल्हा शामली, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी आरोपीकडे सखोल तपास केला. त्यावेळी आरोपीने अन्य पाच साथीदारांसह संबंधित गुन्हा आणि इतर गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे आणि पोलीस अंमलदार नितीन तेलंगे, इरफान मोमीन, अमोल आवाड, गजानन सोनुने व चेतन होळकर यांच्या पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन तपास केला. या कारवाईत पोलिसांनी १३९.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल फोन, एक धारदार चाकू आणि एक लोखंडी कटर असा एकूण २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवप्रकाश मुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश महाला, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे तसेच पोलीस अंमलदार गजानन सोनुने, नितीन तेलंगे, इरफान मोमीन, अमोल आवाड, नितीन जाधव, चेतन होळकर, श्रीकांत घवले, अजिम शेख, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश राठोड, सुमित खुट्टे, ज्ञानेश्वर पांचाळ, शांत पालांडे, महेश पवार, रजत राजेशिर्के आणि अविनाश दरवडे यांनी सहभाग घेतला.





