Abhijit Dipke : मोठी बातमी.! तिरंगा रॅलीआधीच अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP च्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार?
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आपल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला. ‘माझा गुन्हा काय?’ असा सवाल त्यांनी पोलिसांना केल्याचे वृत्त आहे.

Abhijit Dipke : राजधानी दिल्लीमध्ये ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रॅली सुरू होण्यापूर्वीच कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनाच्या ठिकाणी खळबळ उडाली आहे.
सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आंदोलनाचा प्रमुख चेहराच पोलिसांच्या ताब्यात गेल्याने आता या रॅलीचे पुढे काय होणार, समर्थक आंदोलन सुरू ठेवणार का आणि नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील सेंट्रल पार्कमध्ये समर्थकांची गर्दी जमली असताना पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील वातावरण अधिकच तापले आहे.
रॅलीपूर्वीच पोलिसांची कारवाई; नेमकं काय घडलं?
शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्क परिसरात ‘लेहरा दो तिरंगा’ रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून CJP चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्याचा पक्षाचा प्रयत्न होता.
मात्र, या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. रॅली काढू नये, यासाठी पोलिसांनी अभिजीत दिपके यांना यापूर्वीच नोटीस बजावली होती. या नोटिशीवर दिपके यांनी स्वाक्षरीही केली होती.
तरीही नियोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर समर्थक सेंट्रल पार्क परिसरात जमू लागले. याच दरम्यान पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले.
‘माझा गुन्हा काय?’ दिपके यांचा पोलिसांना सवाल
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आपल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला. ‘माझा गुन्हा काय?’ असा सवाल त्यांनी पोलिसांना केल्याचे वृत्त आहे.
दुसरीकडे, आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नसल्याने आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना गर्दी जमवली जात असल्याने कारवाई करण्यात येत असल्याची भूमिका पोलिसांनी घेतली.
आता रॅलीचे नेतृत्व कोण करणार?
अभिजीत दिपके हे CJP चे संस्थापक आणि या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. त्यामुळे रॅली सुरू होण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेतल्याने आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
समर्थक नियोजित कार्यक्रम पुढे सुरू ठेवणार का, पोलिसांच्या निर्बंधांचे पालन करणार का आणि पक्षातील इतर नेते नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.






