Pune Liquor Case: सीआयडीचा मोठा दणका! विषारी दारू प्रकरणात मुख्य सूत्रधारासह ९ जणांवर ‘मोक्का’…वाचा सविस्तर
Pune Liquor Case: विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची मोक्का प्रस्तावाला मंजुरी; सीआयडीच्या तपासात संघटित गुन्हेगारी निष्पन्न.

Pune Liquor Case – हडपसर आणि दापोडी- फुगेवाडी परिसरात मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टी दारू सेवनामुळे २१ जणांचा मृत्यू झाल्याच्या बहुचर्चित प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मोठी कारवाई केली. मुख्य आरोपी दत्ता ऊर्फ भाऊ भिवराव लोंढे आणि त्याच्या संघटित टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली. विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी यास मंजुरी दिली आहे.
सीआयडीकडून तपास सुरू असलेल्या हडपसर पोलीस ठाण्यातील विषारी दारूच्या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टी दारूचे सेवन केल्याने हडपसर परिसरातील चार, तर दापोडी-फुगेवाडी परिसरातील १७ अशा एकूण २१ जणांचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान दत्ता ऊर्फ भाऊ लोंढेने स्वतःच्या नेतृत्वाखाली आकाश जाधव,
योगेश व्हनकडे, राधेश्याम प्रजापती, कल्पेश अग्रवाल, आर्यन धोत्रे, अभिषेक चौबे, अरुण चौबे आणि अंकित चौबे यांच्यासह संघटित गुन्हेगारी टोळी तयार केल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री करून आर्थिक फायदा मिळवल्याचा तपासात निष्कर्ष निघाला आहे. या टोळीतील सदस्यांविरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा झाली नसल्याचे तपासात आढळले.
त्यामुळे समाजात निर्माण झालेली भीती आणि दहशत लक्षात घेऊन या संघटित गुन्हेगारी टोळीला मोक्का लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी त्याला मंजुरी दिली. ही कारवाई अपर पोलीस महासंचालक (गुन्हे) सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आणि पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपाधीक्षक शामराव काळे यांनी केली.





