Cyber Crime : व्हाट्सॲप डीपी लावून ७० लाखांचा गंडा; रावेतच्या नामांकित कंपनीची फसवणूक
Cyber Crime : रावेत परिसरात खळबळ; अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तांत्रिक तपास सुरू.
Updated On:

Cyber Crime – रावेत येथील एका नामांकित कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सॲप डीपीला लावून कंपनीच्या अकाऊंटंटकडून ७० लाख रुपये उकळण्यात आले. ही घटना १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांक ९१ ७०४४६०२३९६ धारक आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ए.व्ही.एच. ग्लोबल फार्मस प्रा.लि. मधील पुरुष फिर्यादीने शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) रोजी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कंपनीचे मालक असल्याचे भासवून अकाऊंटंट मनोज सपकाळ यांना व्हॉट्सॲपवर संदेश पाठवले.
प्रोफाइलवर मालकाचा डीपी असल्याने विश्वास ठेवून मनोज यांनी सांगितल्याप्रमाणे ७० लाख रुपये आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर वर्ग केले. आरोपीने आणखी ३० लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने पुढील व्यवहार थांबवण्यात आला. सायबर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत.





