शिरूर – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील हिलाळ वस्ती येथे शेतातील वादातून महिलेस मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी धुरपाबाई देवराम शिंदे (वय ६०, व्यवसाय शेती, रा. हिलाळ वस्ती, कवठे येमाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. धुरपाबाई शिंदे या आपल्या जाऊ सुशिला दत्तात्रय शिंदे व शोभा विनायक शिंदे यांच्यासह शेतात काम करून घरी जात असताना वाद निर्माण झाला. दरम्यान, फिर्यादींच्या शेत गट नं. १६३१/१ मध्ये आरोपी हरीदास मुलमुले यांनी आपली गुरे बांधली होती. याबाबत फिर्यादींनी हरकत घेतल्यावर त्याचा मुलगा सुरज हरीदास मुलमुले याने उर्मटपणे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सुरज, संगीता, बाळु, संग्राम व पमा मुलमुले या पाच जणांनी धावत येऊन फिर्यादींना शिवीगाळ केली. आरोपी संगीता हिने फिर्यादींचे केस पकडून गळा दाबला व जमिनीवर पाडले, तसेच सर्वांनी मिळून हातांनी मारहाण केली व धमकावले. या घटनेनंतर शिंदे यांनी शिरूर पोलिसांत तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा पुढील तपास पो.हवा. अरुण उबाळे हे करीत आहे.ग्रामस्थांत या घटनेने एकच खळबळ उडाली असून, शेतातील वाद आता मारहाणीपर्यंत पोहोचल्याने संताप व्यक्त होत आहे