Pune District : वाघोलीत गुन्हेगारी डोके काढतेय वर

वाघोली : स्वतंत्र वाघोली पोलीस ठाण्याची निर्मिती झाली असली तरी वाघोली व परिसरामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे वाघोलीत गुन्हेगारी डोके वर काढताना दिसत आहे. मंगळवारी (दि.२४) तरुणांच्या टोळक्याने कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसऱ्याच दिवशी बुधवारी (दि. २५) पहाटे वाघोली वडजाई रोडवर एकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच बकोरी फाटा येथे गोळीबार झाल्याची घटना ताजीच आहे.
वाघोलीत भर गर्दीत कोयता हातात घेवून तरुणांच्या दोन टोळीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका टोळीने दुसऱ्या टोळी मधील एकावर हल्ला केल्यावर त्याचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या टोळीने पहिल्या टोळी मधील एकावर हल्ला केला. यामध्ये दोघे जण जखमी झाले. या प्रकरणी एकमेकांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून तीन अल्पवयीन मुलासह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना भर आठवडे बाजार दिवशी वाघोलीतील आव्हाळवाडी फाट्यावर मंगळवारी (दि. २४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक एवढे जण कोयता घेऊन फिरत असल्याने नागरिक भेदरून गेले होते. घटनेची माहिती कळताच वाघोली पोलिसांनी धाव घेत पाठलाग करून तिघांच्या मुसक्या आवळल्या. यामुळे परिस्थिती निवळली. या प्रकरणाने खून झाल्याची अफवाही पसरली होती. मात्र ती अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
कोयत्याची दहशत संपत नाही तोच वाघोलीतील वडजाई परिसरात राहणाऱ्या निलेश सुभाष सातव (वय ३५, रा.वडजाई वस्ती) यांच्या घराच्या खिडकीतून अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या सुमारास गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये कोणालाही गोळी लागली नाही. घटनेची माहिती कळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी दाखल धाव घेतली. पोलिसांकडून हल्ले खोरांचा शोध सुरू केला आहे. मात्र गोळीबार का करण्यात आला याचे कारण कळू शकले नाही.
काही दिवसापूर्वी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आपल्या मित्राला पुनर्वसन केंद्रात नेऊ नये यासाठी एका तरुणाने त्याच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार केला होता. सुदैवाने त्या घटनेतही कोणी जखमी झाले नव्हते. पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने वाघोली व परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे बोलले जात आहे.





