प्रभात वृत्तसेवा मंचर – अल्पवयीन मुलीच्या भांगात कुंकू भरून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या मामीने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यात सातगाव पठार भागातील एका गावात मंगळवार, दि.२९ रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी महिलेची सासू व निर्भया, असे दोघी घरात असताना त्यावेळी फिर्यादी महिलेचा खेड तालुक्यात राहणारा पुतण्या घरी आला. त्याने निर्भया हिस घरातील कुंकवाचा डबा घेऊन त्यातील कुंकू तिच्या भांगात भरले. तू आता माझी झालीस, असे बोलून निर्भयाला शिवीगाळ करत धमकी देत दमदाटी केली आहे. तसेच निर्भयाला मिठी मारून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे. यासंदर्भात निर्भया मुलीने झालेला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर मामीने मंचर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर संबंधित तरुणाविरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस करत आहेत.